नागपूर, दि.20 : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील केंद्रे तातडीने सुरु करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनला दिले. याबरोबरच धान खरेदीत दिरंगाई होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.
भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाला 2019-20 या खरीप हंगामाकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी योजनअंतर्गत मिटेवाणी, बघेडा, बेळगाव, भंडारा,वरठी व कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या परवानगीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी श्री. पटोले यांनी शेतकऱ्यांची धान खरेदी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पाऊस आणि लांबलेल्या धान खरेदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी खरेदीसंदर्भात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला आमदार राजू माणिकराव कारेमोरे, जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन, महाराष्ट्र राज्य को.ऑप.फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.