नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ‘मोबाईल गाईड’सोबत अनोखी सफर (विशेष वृत्त)

नागपूर,दि. 20 : नागपूरकरांसाठी अजब बंगला असलेले येथील मध्यवर्ती संग्रहालय प्रेक्षकांना एका अनोख्या दुनियेत घेऊन जाते. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या वस्तू संग्रहालयाने आधुनिकतेशी नाळ जोडून घेतली आहे. संग्रहालयाने मोबाईल ॲप आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून निर्माण केलेला ‘मोबाईल गाईड’ या ऐतिहासिक स्थळासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

ब्रिटीश राजवटीत 1863 मध्ये निर्माण झालेल्या या संग्रहालयाचे प्रशासक वेळोवेळी बदलले गेले आहेत. ब्रिटीश प्रशासनातील पब्लिक इन्स्ट्रक्शन,कृषी,उद्योग आदी विभागाच्या नियंत्रणाखाली असलेले हे संग्रहालय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मध्यप्रांताच्या शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वस्तू संग्रहालयाचा कारभार पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे सोपविण्यात आला आहे.  संग्रहालयाच्या या प्रशासकीय प्रवासाची गोष्ट एका अर्थाने संग्राह्य आणि अभ्यासकांसाठी कुतूहलाची आहे. कला,जीवशास्त्र,पुरातत्व,इतिहास,भूगोल अशा विविध शाखांना स्पर्श करणाऱ्या वस्तू आणि कलांनी संग्रहालय सजले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उत्खननात सापडलेल्या मूर्ती,मध्ययुगीन युद्ध साहित्य,नकाशे,विविध राजवटींचे दर्शन घडविणाऱ्या वस्तूंचा यात समावेश आहे.

वाकाटक कालखंडातील विष्णूची प्रतिमा,बाराव्या शतकातील ब्रह्मामूर्ती,मुघलकालीन,राजपूतकालीन अशा विविध राजवटीतील वस्तू येथे पाहायला मिळतात. या वस्तूंच्या रचनेवरुन तत्कालीन राज्यकर्ते किती कलासक्त होते याचे दर्शन घडते. आपल्या पूर्वसुरिंनी उपलब्ध साहित्यसामग्रीतून निर्माण केलेल्या या वस्तू त्यांच्या बद्दलचा आदर वाढवितात. याबरोबरच येथील उत्खननात सापडलेले प्राण्यांचे अवशेष या परिसराचे पुरातत्वीय महत्त्व विषद करतात. विविध प्राणी,पक्षी यांना नैसर्गिक अधिवासात दर्शवून त्यांचे जंगलातील महत्त्व अधिक स्पष्ट केले आहे. येथे विविध दालनांत प्रत्येक विषय वेगवेगळा मांडला आहे. त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक खिडकीवर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. या कोडमुळे या प्राण्यांची,पक्षांची माहिती क्षणात उपलब्ध होते.

0000