राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने बाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मोबदला द्यावा – नाना पटोले

नागपूर, दि. 20 : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका व बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका येथील ज्या शेतकरी आणि कास्तकारांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६साठी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अधिक मोबदला मिळेल असे पाहावे.यासाठी संबधित जिल्हाधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा,यासंदर्भात काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आधार घ्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी,प्रकल्प बाधित शेतकरी आणि कास्तकरी उपस्थित होते.

बैठकीत अध्यक्षांनी  शेतकरी,कास्तकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समन्वयाने यासंदर्भात अधिकची मदत कशी करता येईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.