उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेचे लोकार्पण
अमरावती,दि.२० – गावे सुखी व समृद्ध झाली तरच देश उन्नत होईल. समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान व समन्वय संस्था मोलाची कामगिरी करेल,असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.
उन्नत भारत अभियानात विदर्भ विभागीय समन्वय संस्थेचे लोकार्पण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झाले,त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे महापौर चेतन गावंडे,अभियानाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर,विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले,अभियानाच्या विदर्भ समन्वयक अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, शाश्वत ग्रामविकास घडण्यासाठी व सर्व शासकीय योजना अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान महत्वाचे ठरेल. अधिकाधिक संस्था व युवक- युवतींनी अभियानात सहभागी व्हावे. युवकांनी ग्रामीण जनजीवनात मिसळून तेथील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. या उपक्रमात सातत्य ठेवून अभियान यशस्वी करावे.
डॉ. भटकर म्हणाले की, अनेक विद्यापीठांच्या समन्वयातून संशोधन व योजनांचा लाभ ग्रामीण नागरिकांना करून देण्याचे अभियानाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यानुरूप गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण योजना राबविणे,योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे,विधायक कार्य करणाऱ्या संस्थांना व्यासपीठ मिळवून देणे आदी कार्ये अभियानात करण्यात येतील.
विदर्भात अभियानात १८ संस्था सहभागी असून,१५ अशासकीय संस्था व ११२ नोंदणीकृत संस्थांचा सहभाग आहे. अभियानात ५६०दत्तकग्राम समाविष्ट आहेत. अभियानात विद्यार्थी ग्रामविकासावर नवीन संकल्पनावर आधारित प्रकल्प सादर करू शकतील. त्याचा लाभ नॅकद्वारे संस्थेचे मूल्यांकन वाढण्यासाठी होणार असून,विद्यार्थ्यांना शासकीय कामाचा अनुभव दिशादर्शक ठरेल,अशी माहिती श्रीमती बारब्दे यांनी दिली.