‘उमेद’ अभियानाला कृषी आजीविका क्षेत्रासाठी पहिला पुरस्कार
मनरेगांतर्गत जलसंधारण तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचीही दखल
नवी दिल्ली, 19 : दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
येथील पुसा परिसरातील सी. सुब्रमन्यम सभागृहात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा , अवरसचिव अलका उपाध्याय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान देणा-या राज्यांना व संस्थांना विविध श्रेणींमध्ये एकूण 266 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
‘उमेद’ला कृषी आजीविका क्षेत्रासाठी पहिला पुरस्कार
दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) देशातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आणि अन्य अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘उमेद’अंतर्गत राज्यात महिलांसाठी शाश्वत शेतीवर भर देत महिलांना शेती पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रमांर्तगत राज्यात 5 लाख महिला शेतक-यांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात 3 हजार कृषी सखींच्या माध्यमातून महिला बचत गटांना शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतीमध्ये ब्रह्मास्त्र, निमास्त्र, गांडूळखत आदींचा वापर असे विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. याच कार्याची दखल घेऊन उमेदला गौरविण्यात आले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला राज्यांच्या श्रेणीत तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या मनरेगा कार्यक्रमाचे माजी सहायक आयुक्त तथा नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मनरेगांतर्गत राज्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात आले. राज्यातील 143 तालुक्यांतील ब्लॉकमध्ये या योजनेंतर्गत जलसंधारणाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या योजनेंतर्गत मागील वर्षी 40 हजार जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली तसेच या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांवर 70 टक्यांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला.
मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी अमरावती जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून या जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड आणि जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्हयात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी यवतमाळ जिल्हयातील बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे आणि नंदूरबार जिल्हयातील भादवड गावचे ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत(ग्रामीण) आर्थिक वर्ष 2016-17 आणि 2017-18 मध्ये शासनाने ठरवून दिलेले घरबांधणीचे उद्दिष्टय कमी वेळात पूर्ण केले आहे.
सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी उपस्थितांना संबोधित केले.
000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.271/ दिनांक 19.12.2019