मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न

नागपूर, दि. 19 : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश मोफत मिळावा याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढणे, 0 ते 6 वयोगटातील खासगी बालवाडी, नर्सरी, केजी यापैकी नोंदणी झालेल्या किती आहेत. याबाबत शासन निर्णय लागू करण्याबाबत, शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार शाळा ते घर यामधील अंतर यासंदर्भात तसेच एस.सी., एस.टी. आणि ओ.बी.सी. घटस्फोटित महिलांकरिता त्यांच्या स्वत:चे जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत, मोफत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांच्या उत्पन्नात वाढ करणे, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या समस्या, आरटीई अंतर्गत वर्ग 5 ते 8 पर्यंतचे विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित राहत असणे, व यासंदर्भातील अन्य विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

याबाबत श्री.पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ऑनलाईन नोंदणीसंदर्भात शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही श्री.पटोले यांनी सांगितले.

बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, आरटीईचे अध्यक्ष मोहमद शहिद शरीफ, उपसचिव राजेंद्र पवार, शिक्षण संचालक पुणे दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसचिव सतीश मेंदे आदी उपस्थित होते.