गडचिरोली दि.18: उडान सौर उर्जा प्रकल्प व केवळ गडचिरोली जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता,या प्रकल्पातील उत्पादने देशभर विकली जावीत,अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.
अहेरी येथे उमेद;महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून उडान सोलर एनर्जी प्रा.लि.चे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार,जिल्हाधिकारी शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार,अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे,आयआयटी मुंबईच्या तांत्रिक मार्गदर्शक अभिलाष चव्हाण उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले,या प्रकल्पातून उत्पादित होणारे सोलर पॅनल राज्याच्या बाहेर विक्रीला जावेत. माझे गृहराज्य असलेल्या उत्तराखंडमधील माझ्या घराच्या छतावर देखील इथले सौर पॅनल लागलेले असतील इथपर्यंत तर हा प्रकल्प यशस्वी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महिला आज बचतगटाच्या माध्यमातून संघटीत होऊन त्या कुक्कुटपालन,शेती आणि अन्य व्यवसाय उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीस हातभार लावीत आहे. सोलर ऊर्जेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यास महिलांना मदत होईल. काही वर्षापूर्वी महिलांचे वैयक्तिक बँक खाते नव्हते.आज बचतगटाच्या माध्यमातून महिला बचत करून व्यवसाय करू लागल्या आहे. त्यामुळे त्यांचे आता बँकेत खाते देखील आहे. महिलांनी मेहनत करून आपल्या क्षेत्राला प्रगतीकडे न्यावे. यासाठी प्रशासन सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंग म्हणाले,एक ते दीड वर्षाच्या मेहनतीतून हा प्रकल्प साकारला आहे. त्याचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. येथे दहा मेगावॅटपेक्षा कमी क्षमतेच्या सोलर पॅनलची निर्मिती करण्यात येणार आहे. सोलर पॅनलची इथे केवळ निर्मितीच नव्हे तर देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईसारख्या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनातून सोलार पॅनलचे उत्पादन करण्यात येणार असल्याचे सांगून श्री. सिंह म्हणाले,या एजन्सीला नफ्यात कसे आणता येईल याकडे आपण लक्ष राहणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या व्यवसायातून या भागातील महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
उडान एनर्जी प्रकल्पाच्या नुरी शेख प्रकल्पाच्या उभारणीबाबत माहिती देताना म्हणाल्या की, इथल्या महिलांना इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांचे कौशल्य यामधून विकसित होणार आहे. सौर ऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करून ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न राहणार आहे. रुखमादेवी,प्रगती आणि भरारी या को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना सक्षम करण्यात येत आहे. बचतगटातील 1436 महिला ह्या प्रकल्पाशी जुळल्या आहेत. 40 महिलांना या प्रकल्पातून आता रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरकणी महाराष्ट्राची नवउद्योजकता स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जिल्ह्यातील धनलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचतगट देवलामारी,आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचतगट धानोरा आणि आदर्श महिला स्वयंसहायता बचतगट नवरगाव या बचतगटांना राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रत्येकी दोन लक्ष रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी राज्यपालांनी उडान सोलर एनर्जी प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन केले. प्रकल्पाची पाहणी करुन प्रकल्पातून उत्पादित करण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची माहिती तेथे काम करणाऱ्या महिलांकडून जाणून घेतली.
कार्यक्रमाला अहेरी भामरागड,सिरोंचा व एटापल्ली तालुक्यातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची देखील उपस्थित होते.