नागपूर, दि. 18 : गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उजव्या कालव्याचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची कार्यवाही वेगाने पूर्ण करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला न्यावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उजव्या कालव्याच्या बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भूसंपादन करावयाच्या जमिनीचे मूल्यांकन करून दर निश्चित करून दिले आहेत, त्यानुसार प्रत्येक मौजामध्ये अस्तित्वात असलेले सरळ खरेदीचे व्यवहार व रेडी रेकनरचे दर यापैकी जे जास्त असतील ते दर आकारगटाप्रमाणे निश्चित करून दिले आहेत , त्या दरांना जिल्हाधिकारी स्तरावर गठित समितीने मान्यता दिली आहे, या नियमानुसार भूसंपादन खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत . जर जमीन सुपीक आणि बारमाही ओलिताखाली असेल तर त्यानुसार जमिनीचा आकारगट महसूल विभाग ठरवतो व त्यानुसार दर निश्चित होतो, ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, ऑर्डर पास झाल्या आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली, यात आता प्रभावक्षेत्रातील ज्या गावात भूसंपादनाची प्रक्रिया बाकी आहे, त्या गावात भूसंपादन करताना जमीनधारकांना आवश्यक ते सहकार्य करून हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, असे श्री. पटोले यांनी यावेळी सांगितले.
००००