नागपूर, दि. 18 : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री अनिल सोले, रामदास आंबटकर यांनी नियम 289 अन्वये हा विषय मांडला होता.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. या घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्तांना बोलावून माहिती घेतली असून तातडीने कडक सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तसेच गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. महापौर श्री.जोशी यांच्याकडूनही माहिती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.