इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय (विशेष वृत्त)

0
11

नागपूर, दि. 16 :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून  विधिमंडळात सादर केले जाणारे सर्वच मसुद्यांचे मराठीकरण संचालनालय करते. नागपूर अधिवेशन काळातही शिबीर कार्यालयाच्या माध्यमातून संचालनालयाचे कार्य सुरू आहे.

राजभाषा मराठीचा वापर व विकास करण्याच्या उद्देशाने6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शासन व्यवहारात तसेच विधी व न्याय व्यवहारात राजभाषा मराठीची वापर करण्याच्या दृष्टीने मराठी अनुवाद व परिभाषा निर्मिती  या प्रमुख जबाबदाऱ्या भाषा संचालनालय पार पाडत आहे. विशेषतः राज्यातील सर्वसामान्य जनतेला कायदे समजावेत यासाठी ते मराठी भाषेतच उपलब्ध करून द्यावेत यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 चे कलम 5 ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.  त्यामुळे भाषा संचालनालयाद्वारे राज्य विधिमंडळात सादर करण्यात येत असलेली सर्व शासकीय विधेयके, राज्यपालांचे अध्यादेश यांचा मराठी व हिंदी भाषेत अनुवाद भाषा संचालनालयातर्फे केला जातो. याबरोबरच विधिमंडळात सादर केली जाणारी खर्चाची पूरक विवरणपत्रे, अर्थसंकल्पविषयक निवेदन, अर्थसंकल्पीय अंदाज व अधिक खर्चाची विवरणपत्रे, भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्या अहवालाचेही मराठी अनुवादाचे काम संचालनालय करते. राज्यपालांच्या अभिभाषणांचे अनुवादही संचालनालयच करते.

राज्य अधिनियम, विधेयके आणि अध्यादेश मराठी भाषेत विधिमंडळात सादर करणे हे महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे अधिवेशनात मांडली जाणारी सर्व विधेयके मराठी भाषेतच मांडली जातात.  त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाअगोदर जी विधेयके मांडली जाणार आहेत, त्यांचा मराठी व हिंदी अनुवाद करण्याचे महत्त्वाचे काम संचालनालय करते. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच संचालनालयाचे काम सुरू होते. त्याचबरोबर या विधेयकात विधिमंडळातील चर्चेनुसार काही बदल झाला तर तो बदल स्वीकारून नवे विधेयक मांडले तर ते त्याचेही भाषांतर तातडीने करून द्यावे लागते. संचालनालयाचे सचिव अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक नंदा राऊत, भाषा उपसंचालक(विधि) अरूण गिते, भाषा अधिकारी (हिंदी) वि.ध. उंबरकर, सहायक भाषा संचालक (अर्थसंकल्पीय प्रकाशने) सं. पु. सैंदाणे व सहायक भाषा संचालक (विधि) व. नि. निकुंभ आदी नागपूर शिबीर कार्यालयात अनुवादाचे काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here