शिवाजीराव पाटील यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेला नेता – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

नागपूर, दि. 16 : प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या निधनामुळे शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.विधानपरिषदेत सभागृह नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माजी आमदार दिवंगत श्री.पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.

श्री.नाईक निंबाळकर म्हणाले, राज्यभर शिक्षकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करणारे श्री.पाटील हे खऱ्या अर्थाने आक्रमक नेते होते. सांगली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांशी त्यांचा संबंध होता. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी महत्त्‍वपूर्ण योगदान दिले.

श्री.देसाई यांनी आपल्या शोकप्रस्तावात सांगितले, सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात शिवाजीराव पाटील यांनी अतुलनीय काम केले. ते सांगली विकास मंडळाचे अध्यक्ष होते. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

वित्तमंत्री जयंत पाटील म्हणाले, श्री.पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यांना लाखो शिक्षक उपस्थित असत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी आग्रही असणारा नेता म्हणून त्यांचा संघर्ष प्राथमिक शिक्षक कायमस्वरुपी लक्षात ठेवतील.

या शोकप्रस्तावावर सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, विनायक मेटे, कपिल पाटील, पृथ्वीराज देशमुख, सुरेश धस आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.