अपघात व अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे आवाहन

0
10

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी ‘हायवे मॅनर्स’ अभियानाचा आरंभ

मुंबई, दि. 11 : राज्यातील महामार्गावरील अपघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महामार्ग हायवे पोलीस आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायवे मॅनर्स’ (महामार्ग सुरक्षा) अभियान राबवित असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनी दिली.

महामार्ग पोलीस आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने पिपल वॉलनेट ही संस्था रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत यासाठी ‘#हायवे मॅनर्स’ हे अभियान राबविणार आहे. या अभियानाचा आरंभपर कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई येथील पोलीस जिमखान्यात करण्यात आले होते. यावेळी श्री.कारगांवकर बोलत होते.

श्री. कारगांवकर म्हणाले, महामार्गावरील अपघातात मृत्यु होणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे. भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ मानवी चुकांमुळे महामार्गावर 83 टक्के अपघात होत आहे. हे प्रमाण कमी करता यावे यासाठी महामार्ग पोलीस आणि इंडियन ऑइल यांच्या पुढाकाराने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर शाश्वत असे‘#हायवे मॅनर’अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.कारगांवकर यांनी यावेळी दिली.

हे अभियान मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई – गोवा हायवे येथे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दुचाकी, व्यावसायिक वाहन, बस, कृषी सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहनचालकांमध्ये हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वेग मर्यादा, जड वाहनांना शहरातून दिवसा बंदी, ट्रान्सपोर्टचे वाहन आणि शेतकऱ्यांच्या वाहनांना परावर्तक इत्यादी संदर्भात वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी होर्डिंग, बॅनर, पेट्रोल पंप येथे माहितीपत्रक, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, वॉलपेंटींग, स्टँडीज, सोशल मीडिया याद्वारे अभियानाची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती श्री.कारगांवकर यांनी दिली.

श्री. डाकवले म्हणाले, ‘इंडियन ऑइल’ अतिशय ज्वलनशिल पदार्थांची वाहतूक करते. यामुळे वाहन चालकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून आणि नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून, हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले, रस्ते अपघात वेगमर्यादा न पाळणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे यामुळे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निष्कर्षास आले आहे. राज्यात 2018 मध्ये रस्ते अपघातात साधारण 13 हजार 261 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर, दर दिवशी साधारण 36 लोक याप्रमाणे दोन तासात तीन लोकांचा मृत्यू होत असल्याचे प्रमाण आहे. सर्वात जास्त नाशिक, धुळे, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे 36 टक्के आणि राज्य महामार्गावर 33 टक्के प्रमाण आहे. जर प्रवाशांनी सीट बेल्ट वापरले तर 40 ते 65 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. हेल्मेटचा वापर केल्यास 40 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक सुबोध डाकवले, महाव्यवस्थापक (ब्रँडींग) संदीप शर्मा, प्रभारी मुरली श्रीनिवास, ठाणे प्रादेशिकचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, मिलिंद मोहीते, संजय शिंत्रे आदीसह अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील रस्ते अपघात- 2018 या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. ‘#हायवे मॅनर’अभियानाच्या ॲपद्वारे नागरिकांना रूग्णवाहिका, रूग्णालय, ट्रॅफिक आदींची माहिती करून घेता येणार आहे. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात उपस्थिताना शपथ देण्यात आली.

०००

श्रद्धा मेश्राम/11.12.19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here