संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभाग उभारणार डीएनए प्रयोगशाळा

0
7

प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला

मुंबई, दि. 10 : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला३ कोटी ९६ लाखरुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया  सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.

मानव वन्यजीव संघर्षात विशेषत: जेव्हा यात मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेव्हा घटनेच्यावेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.  आतापर्यंतअशा वन्य प्राण्यांची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता. आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे.

सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने  हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पाहावी लागते. दरम्यान मानव वन्यजीव संघर्षात कारणीभूत ठरलेल्या प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित न झाल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम१९७२ चे कलम ११ वराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डीएनए चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावेत याकरिता वन विभागात स्वतंत्र डी.एन.ए चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे अत्यंत आवश्यक होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी इमारत उपलब्ध आहे. मुंबई शहरात उपलब्ध असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ, वाहतुकीची सोय लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.  राज्यात दुर्देवाने कुठे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या तर कोणत्या वन्यजीवाकडून हे कृत्य घडले याची अचूक ओळख पटवणे या डीएनए चाचणीमुळे शक्य होईल, असेही श्री.अहमद यांनी सांगितले.

००००

डॉ.सुरेखा मुळे/विसंअ/10.12.19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here