मुंबई, दि. 4 : मुलींनी शालेय स्तरावरच तंत्रज्ञानाचे आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्वत:ची प्रगती साधावी. असे सांगत स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने स्वीडीश शासन आणि भारत सरकारच्या नीती आयोगामध्ये करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारे भारतात अटल इनोव्हेशन अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या अटल टिंकरिंग लॅबने एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट) येथे दोन दिवसीय टेक्ला महोत्सवांतर्गत विद्यार्थिनींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी नीती आयोगाच्या कार्यक्रम संचालिका इशिता अग्रवाल, आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्य सचिव डॉ. माया फेजस्टेड, स्वीडन रॉयल इन्स्टिट्यूटच्या मेडलिन सिओस्टेड, स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष सिस्लोनिथ कार्लसॉन, स्वीडन दूतावासाचे सचिव व्हिगो बारमॅन, आदींसह स्वीडनच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अटल इनोव्हेशन अभियानांतर्गत देशात ७०० जिल्ह्यातील शाळांत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या विषयावर आधारित अटल टिंकरिंग लॅब हा कार्यक्रम राबविला जातो. अटल टिंकरिंग लॅब राज्यात ४०० शाळांत कार्यरत असून, मुंबईत २७ शाळांत कार्यरत आहे. मुंबईच्या अंजुमन इस्लाम हायस्कूल, सैफ तय्यबजी मुलींची शाळा, कुलाबा महानगरपालिका शाळा, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील १५ विद्यार्थिनींचा या कार्यशाळेत सहभाग होता. यामध्ये त्यांना विद्युत उपकरणे त्यांची माहिती, विद्युत पुरवठा, वीज निर्मिती, पीसीबी वापरणे, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली
स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी हॉटेल ताज येथे भेट दिली. २६ नोव्हेंबर २००८रोजी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या कर्मचारी आणि पर्यटकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.
०००