समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया – विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

विश्वासदर्शक ठराव १६९मतांनी संमत

मुंबई दि.३० : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून  महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले. 

मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव १६९मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याबद्दल मी आभार मानतो.  तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांचे स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याची  शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

देशात अनेक राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे.  हे राज्य साधू-संतांचे,वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. मी मैदानातला माणूस असून वैधानिक वातावरणात आलो आहे, ते महाराष्ट्र घडविण्यासाठी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान,सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.  ठरावाच्या विरोधात मतदानासाठी  सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हता.  सदस्य श्री.अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य सर्वश्री जयंत पाटील,नवाब मलिक,सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,एकनाथ शिंदे,सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण,अबू आझमी,हितेंद्र ठाकूर,बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. 

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,जयंत पाटील,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला.