सांस्कृतिक देवाणघेवाणीतून भारत-इजिप्तमधील संबंध अधिक बळकट होतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
12

इजिप्त बाय द गंगा महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 18 : भारत आणि इजिप्त या प्राचीन संस्कृती आहेत. विविध महोत्सवांसारख्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

इजिप्त बाय द गंगा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अरब रिपब्लिक ऑफ इजिप्तच्या भारतीय दूतावासामार्फत दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी इजिप्तच्या भारतातील राजदूत डॉ. हेबा बरासी, इजिप्तचे मुंबईतील कौन्सुलेट जनरल अहमद खलील,  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या प्रादेशिक प्रमुख रेणू प्रितियानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.कोश्यारी म्हणाले की, अशा प्रकारच्या सांस्कृतिक देवाण घेवाणीसाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने सातत्याने प्रयत्न करावेत. अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन इजिप्तमध्ये देखील करुन तेथे भारतीय कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे आणि भारतीय संस्कृती तिथपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्रीमती बरासी यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट आयोजित या महोत्सवात द कैरो ऑपेरा हाऊस बॅलेटमार्फत इजिप्तच्या पारंपरिक नृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच इजिप्त येथील हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन, चित्रप्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here