मुंबई दि.८ : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हयातीचा दाखला द्यावा असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई यांनी केले आहे.
प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय अद्ययावत यादी निवृत्तीवेतनधारकांच्या संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आली आहे. निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतबँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहावे तसेच स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमक्ष स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. हे करताना त्यांनी अचूक पॅन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवणे ही अनिवार्य आहे.
याशिवायhttp://jeevanpramaan.gov.inया केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरून जीवन प्रमाण दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अधिदान व लेखा कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी चालू वर्षी दिनांक१ नोव्हेंबर २०१९नंतर दाखल करावयाचे हयातीचे दाखले या संकेतस्थळावरून नोंदणी करून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करताना निवृत्तीवेतनधारकांनी ते ज्या कोषागारामधून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या कोषागाराची निवड करावी. तसेच स्वत:चे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (पीपीओ नंबर) अचूक नोंदवणे आवश्यक आहे.
जे निवृत्तीवेतनधारक नजीकच्या आधार केंद्रावर अथवा खासगी संगणकीकृत जीवनप्रमाण सुविधा केंद्राद्वारे हयातीचे दाखले सादर करून इच्छितात त्यांनी प्रथम या कार्यालयाकडे त्यांचा पीपीओ नंबर अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.
जे निवृत्तीवेतनधारक अधिदान व लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संगणीकृत हयातीचा दाखला (डिजिटल सर्टिफिकेट) सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयात निवृत्तीवेतन शाखेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या निवृत्तीवेतनधारकानी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखल (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर२०१९पासून स्थगित करण्यात येईल याची कृपया सर्व निवृत्तीवेतनधारकानी नोंद घ्यावी असे आवाहन ही अधिदान व लेखा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.