सकारात्मक दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई,दि. 6 : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी,मच्छिमार,तसेच पर्यटन व्यवसायाच्या नुकसानीची वस्तुस्थिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील नुकसानभरपाईबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या अनुषंगाने शेतकरी आणि मच्छिमारांना नुकसानभरपाईसंदर्भात मागणी श्री. केसरकर यांनी मांडली. ते म्हणाले,पूर्वी झालेल्या पुरातील नुकसानभरपाई येत्या दोन-तीन दिवसात देण्यात यावी. सध्याच्या पावसामुळे नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश क्षेत्रीय स्तरावर देण्यात आले आहेत. तथापि,इतर शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्याने कसण्यास घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. कबुलायतदार गावकर,सरकारी आकारपड तसेच वनसदृश जमिनी अशा राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानीचा मोबदला मिळावा. सातबारावर अनेक नावे आहेत अशा प्रकरणात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.
कोकणातील भात हे प्रमुख पीक असून संपूर्ण भातशेतीच या पावसात नष्ट झाली आहे. त्यामुळे पुढील किमान तीन ते चार महिने शिधापत्रिकेवर कमी दराने तांदूळ उपलब्ध करुन द्यावा. अतिपावसामुळे आंबा व काजूच्या मोहोराच्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी.
मच्छिमारांच्या बोटींचे झालेले नुकसान,वाहून गेलेली जाळी,सुके मासे,मीठ आदींची नुकसानभरपाई देण्याची गरजही श्री. केसरकर यांनी यावेळी मांडली. वादळी पावसामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाता आले नाही. त्यामुळे त्या काळातील निर्वाह भत्ता देण्यात यावा;किंवा होडीच्या आकारानुसार मच्छीमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावून त्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी.
वादळामुळे पर्यटन व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे व्यापाऱ्यांना दिलेल्या नुकसानभरपाईच्या धर्तीवर पर्यटन व्यावसायिकांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी. धूपप्रतिबंधक व खारभूमी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
श्री. केसरकर यांच्याबरोबरच शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ/दि.6.11.2019