लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग

महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस

मुंबई, दि. 5 : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरु झालेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकारी आदींनी भेट देऊन राज्यातील ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारे, गुंफा, किल्ले, जंगले आदींची माहिती घेतली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्राला भेट देण्यासाठी निश्चित यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांश सर्व देशांनी सहभाग घेतला आहे. आपापल्या देशातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन जगभरातील पर्यटक, अभ्यासक, व्यावसायिक आदींना आपल्या देशांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. महाराष्ट्रानेही यात सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर खुले केले आहे. आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विविध पर्यटन संस्थांबरोबर बी टू बी बैठका

आइसलँड ट्रॅव्हलरच्या व्होन पीच, स्नॅप प्रॉडक्शनच्या साशा आरु, आय अॅम्बेसिडर ट्रॅव्हल नेटवर्कचे निकोलस मोन्टमागी, केथ जेनकिन्स, वर्ल्ड शो मीडियाचे अलेक्झांडर कोलीस, पुरातत्वशास्त्रविषयातील पत्रकार डेव्हीड कीज, ट्विटरचे रुचित उप्पल आदी विविध संस्था, पर्यटन कंपन्यांबरोबर आज बी टू बी बैठका घेण्यात आल्या. ओरिसाचे पर्यटन मंत्री जोतीप्रकाश प्रजापती, सचिव विशालकुमार देव, पर्यटन संचालक सचिन जाधव, दिल्लीच्या पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांच्यासह भारतातील विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनीही महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला भेट दिली.

महाराष्ट्र पर्यटनच्या स्‍टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्ले, अजिंठा, वेरुळ, एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव, व्याघ्र पर्यटन, समुद्रकिनारे, जंगले, कास पठारसारखी जागतिक वारसास्थळे, तीर्थक्षेत्रे, लोणावळा, महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान आदी थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, खाद्यसंस्कृती, बॉलिवूड चित्रनगरी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव आदींची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटनचा आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मेराकी कम्युनिकेशन्स यांनी या स्टॉलची संकल्पना आणि बांधणी केली आहे.