मुंबई, दि. 31 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व अवेळी पावसामुळे झालेल्या शेती व मच्छिमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. नुकसान झालेल्या शेतीचे तसेच मत्स्य व्यवसायाचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.
श्री. केसरकर यांनी आज सकाळी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधून वादळी वारे व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व अवेळी पाऊस पडला. त्यामुळे शेती व मत्स्य व्यवसायाचे नुकसान झाले. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे जिल्ह्यात सुमारे 29 हजार 687 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 8 हजार85 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
किनारपट्टीवरील वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी बोटी, मासेमारीचे जाळे, सुकलेली मच्छी वाहून गेल्या आहेत. यामुळे मालवण तालुक्यात 3.90 कोटी, वेंगुर्लामध्ये 3.50 कोटी व देवगडमध्ये 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर दोन घरांचे पूर्णतः तर 18 घरांचे अंशतः आणि 28 घरांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
श्री. केसरकर यांनी सांगितले की, पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता एसआरए पद्धतीने दुबार पिक घेण्यासाठी मार्गदर्शन करून अर्थसहाय्य करावे. लहान-मध्यम आकाराचे बंधारे बांधण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहून गेलेल्या जेट्टीच्या ठिकाणी नवीन जेट्टी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे. लाटामुळे पाणी गेलेल्या विहिरींमधील गढूळ पाण्याचा उपसा करून ते पिण्यायोग्य करावे. ज्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
साथीच्या रोगावर उपाययोजना राबवाव्यात
पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिले. शुक्रवार दि. 1 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात विशेष आरोग्य पथक दाखल होणार आहे. हे पथक पाहणी करून शासनास अहवाल सादर करणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात आवश्यक औषधांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेऊन पर्याप्त औषधांचा साठा तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. साथीच्या रोगांवरील उपाययोजना लोकांपर्यंत पोचविण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर म्हणाले की, चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक कार्यवाही करून प्रयोगशाळा उभारणीची तयारी करावी. याबाबत संबंधित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात यावे.