राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली शपथ

मुंबई, दि. 31- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.

मंत्रालयात आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीदिन हा देशभर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी देशाची एकता टिकवून ठेवण्याची भावना व्यक्त करणारी शपथ उपस्थितांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ राव, गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.