राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ
मुंबई, दि. 31 : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा आरंभ करण्यात आला.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्यावतीने’रन फॉर युनिटी‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राहुल कुल, मुख्य सचिव अजोय मेहता, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देऊन शुभेच्छा दिल्या.
एकता दौड आरंभानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारताला एकसंघ ठेवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनी सर्व भारतीय एकतेची शपथ घेतात. ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत.
केंद्र सरकारने370 कलम हटवून जम्मू काश्मिर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश केले, हे भारताचे अविभाज्य अंग आहेत. सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानून सर्वांना एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
एकता दौडमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जलद कृती दल (क्यूआरटी), कमांडो, पोलीस पथके, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडचा आनंद घेतला.
तत्पूर्वी महेश नावले कराटे अॅन्ड डान्स असोसिएशन आणि एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. एकता दौडचा समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.
000