मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत ४१९ चलचित्र वाहनांना परवानगी

मुंबई दि. 14 : विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे.

निवडणुकीमध्ये आपला प्रचार करण्यासाठी उमेदवार चलचित्र वाहनांचा वापर करतात. गावोगावी ही चलचित्र वाहने पोहोचतात आणि प्रचार व प्रसार करतात. मात्र उमेदवाराला चलचित्र वाहनांद्वारे प्रचार व प्रसार करताना संबंधित परिवहन अधिकारी यांच्याकडून वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते आणि हे प्रमाणपत्र मुख्य निवडणूक कार्यालयाकडे जमा करावे लागते. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत संबंधित चलचित्र वाहनांचे प्रमाणपत्र, वाहनांची इतर कागदपत्र तपासून घेतल्यानंतरच या वाहनांमधून प्रचार करण्याची परवानगी देण्यात येते. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 419 चलचित्र वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.