विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न
मुंबई,दि. ३ : आदर्श आचारसंहितेचे पालन आणि निवडणूक खर्च संनियंत्रण या विषयांच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने बैठक संपन्न झाली.
नामनिर्देशने दाखल करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत (दि. ४ ऑक्टोबर) आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर विविध पक्षांचे उमेदवार निश्चित होतील. निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी यावेळी केले.
मतदारयाद्या अंतिम झाल्या असून त्याची प्रत राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात येईल,असेही यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली. राजकीय पक्षांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राजकीय पक्षांसमवेत वेळोवेळी अशा बैठकांचे आयोजन केले जाते.
यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी,श्री. शिरीष मोहोड,भारतीय जनता पक्षाचे उमेश गोसावी,योगेश देशपांडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अशोक सूर्यवंशी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई,आशिष दुबे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इरफान शेख आदी उपस्थित होते.