मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती


मुंबई, दि. 29 : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. डॉ.पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. यात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

 मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.