विधानसभा इतर कामकाज

0
11

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 22 : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२  रक्कम वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी विधानसभेत दिली.

*****

जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये १०७० पाणी पुरवठा योजना मंजूर – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 22 : रायगड जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १०७० नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४५९ योजनांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून ३९७ योजना प्रगती पथावर आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

श्री.पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सन २०२२ मध्ये उन्हाळ्यात पाणी पुरवठा मुबलक होण्यासाठी ३७ टँकरद्वारे ५८ गावे आणि २४५ वाड्यांत पाणी पुरवठा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील या योजना गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, समीर कुणावार, जयकुमार रावळ यांनी सहभाग घेतला.

******

पाणी पुरवठा कामातील गैरव्यवहाराची चौकशी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 22 : बीड जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील गैरप्रकाराप्रमाणे राज्यातील इतर काही ठिकाणी अशा प्रकारे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.

००००

आदिवासी पाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 22 : आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती पाणी पुरवठा  व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी  विधानसभेत  दिली.

पालघर जिल्ह्यातील दाभोन गावातील कांढोलपाड्यातील पाणीटंचाई संदर्भात विधानसभा सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले, दाभोण गावाची लोकसंख्या 109 आहे. येथे चार हातपंप बसविण्यात आले होते. मात्र त्यातील एक नादुरूस्त होता. या वाडीतील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलजीवन  अभियानात हे गाव घेण्यात आले आहे. बारापोखरणच्या योजनेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ही योजना नवीन योजनेत बसविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या योजनेसाठी अधिकच्या निधीची तरतूद करता येईल का सर्व बाबींची पडताळणी केली जाईल. या योजनेसंदर्भात निर्णय घेताना मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा केली जाईल. आदिवासी पाड्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

*****

पोषणयुक्त तांदळाचेच विद्यार्थ्यांना वाटप – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 22 : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील टेंभी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि नवभारत प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये पोषणयुक्त तांदळाचेच वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी  विधानसभेत  दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्यासंदर्भात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन मंत्री मंत्री श्री.राठोड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आहारात पोषणयुक्त तांदूळ असावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषणयुक्त तांदळाचे वाटप राज्यात करण्यात येत आहे. या तांदळाबाबत चर्चा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे आणि या तांदळाबाबत आता कोठेही गैरसमज नाही, अशी माहिती मंत्री.श्री.राठोड यांनी विधानसभेत दिली.

****

संध्या गरवारे/विसंअ/22.8.22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here