विधानसभा लक्षवेधी

रडार यंत्रणा हलविण्याबाबत एकत्रित बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई दि 24 : मुंबई शहरातील जुहू आणि दहीसर येथे असलेल्या भारतीय विमान प्राधिकरणाच्या रडार यंत्रणा गोराई परिसरात हलवण्याबाबत विचार सुरु असून याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये सदस्या मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय विमान प्राधिकरणाच्या रडार यंत्रणेमुळे काही विशिष्ट उंचीच्या वर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असे निर्बंध आहेत. मात्र या रडार यंत्रणा गोराई येथे हलवण्याबाबत केंद्र सरकारच्या विभागाशी संपर्क साधला जात आहे. त्याचबरोबर याबाबत मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल.

लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

याबाबत सदस्या मंदा म्हात्रे, अभिमन्यू पवार, योगेश सागर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. 24 : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.

००००

श्रीरामपूर येथील घटनेमधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई दि. 24 : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

०००

चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे पोलीस अधीक्षकांना समज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि 24 : चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य राम सातपुते, मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित आदेशाचे काम करणाऱ्या लिपिकावर ठपका ठेवण्यात आला आहे.

0000