अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवंगत आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली

मुंबई दि. 24 : महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता आपण गमावला आहे, राज्याच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यसभा सदस्य रजनी पाटील, आमदार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, धनंजय मुंडे, डॉ. भारती लव्हेकर, श्वेता महाले, मंदा म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील, शिवसंग्रामचे तानाजी शिंदे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, कन्या आकांक्षा, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सार्वजनिक जीवनात मेटे यांची सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडली होती. सर्वच विषयात त्यांचा अभ्यास होता. बीड जिल्ह्यातून त्यांचा सुरु झालेला प्रवास संघर्षमय होता. मुंबई तसेच ग्रामीण परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी कार्य केले. स्त्रीभ्रूण हत्या होवू नयेत यासाठी शिरुर तालुका त्यांनी दत्तक घेवून मोठ्या प्रमाणात जागृती केली. विधान परिषदेत त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा यासाठी कायम अट्टाहासाने भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी त्यांचा संघर्ष सर्वांनी जवळून पाहिला आहे. दुसऱ्यांचे दु:ख आपले समजून त्यातून सामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न मेटे यांनी केला. त्यांचे काम पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने दिवंगत मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत विनायक मेटे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. नेतृत्त्वाचे गुण त्यांच्यात उपजत होते. कुठल्याही विषयाचा मुळापर्यंत पाठपुरावा करणे हा त्यांचा स्वभाव होता. समाजात उद्यमशीलता, सहकार वाढीस लागावा यासाठी त्यांनी विविध संस्था संघटना स्थापन केल्या. समाजातील शेवटचा घटक उपेक्षित राहू नये यासाठी ते सतत कार्यरत राहिले. संघटना आणि कार्यकर्ते हा त्यांचा श्वास आणि तेच त्यांचे कुटूंब होते. मेटे यांचा प्रत्येक क्षेत्रातील जनसंपर्क दांडगा होता. हाती घेतलेल्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा करणे हा त्यांचा स्वभाव होता. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले. भविष्यातही त्यांची आठवण त्यांच्या कामातून राहिल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सामान्य शेतकरी कुटूंबातील त्यांची पार्श्वभूमी होती. राज्य पातळीवर काम करणारे व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी होती.  त्यांची समाजाला गरज असताना ते निघून गेले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील प्रश्नाबरोबर, मराठवाड्यातील प्रश्नांना पूर्णत्वास नेण्याकडे त्यांचा प्रयत्न असायचा. सभागृहातील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची ऊसतोड कामगारांचे प्रश्न ते पुढाकाराने मांडायचे.

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, छत्रपतींचे विचार घेवून लढणारा एक मावळा आपल्यातून गेला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, स्व. गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे उर्वरित कार्य आपण हाती घेवून ते पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मेटे यांच्याविषयी काही हृद्य आठवणी सांगितल्या. यावेळी विविध मान्यवरांनी दिवंगत मेटे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

000