केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश

सातारा दि. 29 : सर्व सामान्य माणूस केंद्र बिंदू माणून केंद्र शासनाच्या विविध योजनांची अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करावे, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केंद्रीय योजनाचा आढावा घेतला. यावेळी सोम प्रकाश बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतुल भोसले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर असणे महत्वाचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीब कुटुंबाना पक्के घर मिळत आहे. या योजनेची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावीत. तसेच जी प्रकरणे नामंजूर झाले आहेत त्याची पुन्हा तपासणी करावी. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाने स्वच्छ पाणी मिळणार आहे. या योजनेचीही ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी छोट्या छोट्या उद्योगांना बँकांनी वित्तीय पुरवठा करावा. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्माण होतील.

आपला देश हा शेती प्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांना बँकांनी मोठ्या प्रमाणात पिक कर्ज द्यावे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा. लोककल्याणकारी ज्या ज्या योजना राबवत आहात त्या योजना राबविताना लोकप्रतिनिधींचाही सहभाग घ्यावा, असे सांगून  सोम प्रकाश यांनी स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्याची तसेच केंद्र शासनाच्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.