वैदर्भीय रंगभूमीचे भूषण गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 30 : वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गणेश नायडू हे मराठी रंगभूमीवरील एक मोठे नाव होते. विविध कलागुण संपन्न असलेले नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विदर्भात हौशी रंगभूमीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीही विसरू शकत नाही. रंजन कला मंदिर नावारुपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.  राज्य शासनाच्या विविध नाट्य स्पर्धांमध्ये तसेच इतर व्यासपीठांवर त्यांच्या नाटकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. हौशी नाट्य कलाकारांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत असत’’.

“त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आयुष्यभर अतिशय निष्ठेने नाट्यकलेची त्यांनी सेवा केली. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना’’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.