मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा ऑगस्ट-2022 या महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या अंकात महाराष्ट्राने केलेल्या आजवरच्या वाटचालीचा समग्र आढावा घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय आहे. राज्यातील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले. या सर्वांचा “स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्र” आणि “स्वातंत्र्यलढा आणि महिला” या लेखातून आढावा घेण्यात आला आहे. नुकताच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणाचा संपादित भाग समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात आले, या अभियानाविषयी माहिती देण्यात आली आहे. 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांचा संक्षिप्त परिचय या अंकात देण्यात आला आहे.
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. या विषयावर आधारित ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ हा लेख अंकात घेण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच http://13.200.45.248/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. वाचकांच्या सूचना, लेखांवरील अभिप्राय lokrajya2011@gmail.com या ई मेलवर पाठविण्यात यावे.
0000
लोकराज्य ऑगस्ट २०२२ (भाग-१)
लोकराज्य ऑगस्ट २०२२ (भाग-२)