शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

0
10

अकोला, दि.२(जिमाका)- महाबीज या कंपनीच्या बियाण्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या विश्वासाची जपणूक करु या. महाबीजच्या शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करुन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून  त्यांचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

 महाबीज येथे आज कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी  विधानपरिषद सदस्य आ. विप्लव बाजोरिया,  महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे, महाव्यवस्थापक प्रशासन गुणनियंत्रण डॉ. पी.एस. लहाने,  महाव्यवस्थापक वित्त मनिष यादव, विवेक ठाकरे, प्रकाश टाटर, प्रशांत पागरुत, विनय वर्मा, प्रबोध धांदे, अमरावती विभागाचे कृषी सह संचालक डॉ. किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. आरीफ शाह, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत कृषी मंत्र्यांसमोर महाबीजचा आढावा सादर करण्यात आला.  सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात महाबीजची आर्थिक उलाढाल, ४३९.७२ कोटी रुप[अये असून महाबीज द्वार विपणन केलेले व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची माहिती देण्यात आली.

कृषीमंत्र्यांनी सुचना केल्या की, महाबीजने बीज निर्मिती , गुणनियंत्रण व चाचणी या सर्व प्रक्रियांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा.  देशाच्या कृषी धोरणानुसार तेलबियांच्या निर्मितीसाठी विशेष मोहिम राबवून तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यात हातभार लावावा.  आदिवासी क्षेत्रातील पारंपारिक पिकांच्या वाणांबाबत संशोधन करुन  या वाणांचाही विकास करावा.  पौष्टीक तृणधान्य पिकांच्या बियाण्यांचा विकास व्हावा. स्थानिक परिस्थिती, वातावरण इ. बाबींचा विचार बियाणे संशोधन करतांना व्हावा.या नवनवीन प्रयोग,संशोधन आणि चाचण्यांसाठी आवश्यक  मान्यता व निर्णयांसाठी आपण पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवणी येथील महाबीजच्या प्रक्रिया केंद्रास भेट देऊन तेथील पाहणीही केली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here