सांगली, कोल्हापूर आणि कोकणच्या धर्तीवर सिन्नरच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करणार – गिरीष महाजन

0
10

सोमवारपर्यंत पंचनामे पूर्ण करावेत

नाशिक, दिनांक: 03 सप्टेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा): गुरूवारी सिन्नर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून अवघ्या दोन तासात १६५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला असून घरांचे, दुकानांचे अंशत:, पूर्णत: नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानींचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या असून त्यानंतर या सर्व अतिवृष्टीग्रस्तांना सांगली, कोल्हापूर आणि कोकणच्या धर्तीवर मदत केली जाईल, असे  ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, यांनी सांगितले. सिन्नर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.

सिन्नर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे, दुकानांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज  गिरीष महाजन यांनी सिन्नर शहरातील देवी रोड, नाशिक वेस, नेहरू चौक, गावठाण, वंजारी गल्ली या भागांना भेटी देवून परिसराची पाहणी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी  श्री. महाजन म्हणाले,  नदीकाठावरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक पूर आल्याने घरे, भिंती व घरसामान वाहून गेले आहे.नागरिकांना त्यांच्या कुठल्याही मालमत्तेला वाचवण्यची संधी   मिळालेली नाही. शहरातील व्यापारी पेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावर ओला झाला आहे.  घटना घडल्यापासून प्रशानामार्फत बचाव व मदतकार्य सूरू करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपाची मदत म्हणून अन्न, धान्य, तेल, चहा,दूध यांचे किट देण्याबरोबरच मंगल कार्यालये व शाळांमधून नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत सिन्नरच्या अतिवृष्टीग्रस्तांना  मदत करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोमवारपर्यंत पंचनामे पूर्ण करून  नुकसान ग्रस्तांना सांगली, कोल्हापूर व कोकणच्या अतिवृष्टीग्रस्तांना ज्याप्रमाणे मदत करण्यात आली आहे तोच निकष त्याच धर्तीवर ही मदत केली जाईल, असेही यावेळी  श्री. महाजन यांनी सांगितले.

पांढुर्ली परिसराची केली पाहणी

सिन्नर शहरातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर  गिरीश महाजन यांनी पांढुर्ली गाव परिसरात समृद्धी महामार्गालगत छत्री आंबा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तेथे समृद्धी महामार्गाचा भराव खचल्याने परिसरातील शेतांमध्ये वाळू व दगडांचा शिरकाव झाला आहे. शेतीचे व शेतीच्या बांधांचेही नुकसान झाले आहे. यावेळी सरपंच पंढरीनाथ ढाकणे व नागरिकांनी  श्री. महाजन यांना व उपस्थित अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती दिली.

0000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here