मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून पडताळणीसाठी अर्जाचे आवाहन

मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या जागांवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विहित वेळेत सादर करण्याचे आवाहन, मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त सलिमा तडवी यांनी केले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेत.  मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी  https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची एक प्रत मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करावी, असे आवाहन समितीच्या अध्यक्ष अनिता मेश्राम (वानखेडे) व उपायुक्त तथा सदस्य सलिमा तडवी, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.

000