भूस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर, दि. 10 : घुग्‍गुस येथे झालेली भूस्‍खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्‍हा घडू नये, यादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करण्‍याचा कसोशीने प्रयत्‍न करण्‍यात येईल, अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

भूस्खलनाच्या घटनेत स्‍थलांतरित  कुटुंबांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्‍येकी १० हजार रूपये तसेच पक्षातर्फे प्रत्‍येकी ३ हजार रूपये मदत प्राथमिक स्‍तरावर करण्‍यात आली असली तरीही आणखी काय मदत करता येईल, ही बाब तपासून आणखी मदत देण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घुग्‍गस येथे मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर धनादेशाचे संबंधित कुटुंब प्रमुखांना वितरण करताना ते बोलत होते. यावेळी देवराव भोंगळे, तहसीलदार निलेश गोंड, विवेक बोढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले. या घटनेची मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पीडित कुटुंबासाठी मंजूर करून आणला. भूस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात आले आहे.

कार्यक्रमाला संतोष नुने, अमोल थेरे, शरद गेडाम, सुशील डांगे, विवेक तिवारी, विनोद चौधरी, हेमंत कुमार, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला, चिन्‍नाजी नलबोगा आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here