गतिमान कामकाजासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्यव्यापी कार्यशाळा

0
9

मुंबई दि. १३ : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने, विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार आणि सक्षम करण्यासाठी अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर, २०२२ रोजी राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विभागातील अभियंत्यांच्या नवनीवन संकल्पना व  योजनांचे सादरीकरण होणार आहे.  या कार्यशाळेस राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग अशा सुमारे ९८ हजार कि.मी. च्या रस्त्यांची नवीन कामे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येतात. सध्याच्या परिस्थितीत यामधील काही रस्त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक असून त्यादृष्टीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्यातील ब्रिटिशकालीन पूल, इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित  असून हे पूल,  इमारती आणि रस्ते यांचा दर्जा अधिक सुधारण्याचे आव्हान राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे. त्यादृष्टीने या कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

१५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे व रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य व अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करणे, शासकीय जमिनींवर नवीन प्रकल्प उभारणे त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहांचा सुयोग्य वापर करणे, विभागाचे संगणकीकरण अद्ययावत करणे, तसेच रस्ते व इमारती यांची देखभाल दुरुस्ती आणि नवीन कामांसदर्भात कृती आराखडा तयार करणे. विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करणे आदी बाबींवर सविस्तर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here