केंद्राच्या योजना राबविताना येणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करणार – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

बुलडाणा, दि.19 : केंद्र शासनाच्या विविध योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. केंद्राच्या योजना राबविताना येणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. यादव यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी प्रामुख्याने बँकांमार्फत विविध घटकांना देण्यात येणाऱ्या कर्ज योजना, कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान, जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना, पोषण आहार, विविध आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, डिजिटल इंडिया, आवास योजना, कामगार कल्याण योजनांचा आढावा घेतला.

यावेळी श्री. यादव म्हणाले, केंद्र शासनाच्या सहयोगाने राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा आश्वासक विकास आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असलेल्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यात जनतेच्या विकासासाठी प्रतिबद्ध असलेले सरकार आहे. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रशासनाने दुवा म्हणून कार्य करावे.

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. मात्र एक विभाग दुसऱ्या विभागाशी माहितीचे आदान प्रदान करीत नाही. आजच्या काळात माहितीचे आदान प्रदान याबाबीला प्रचंड महत्त्व आले आहे.  त्यामुळे प्रत्येक विभागाने आपली माहिती दुसऱ्याशी आदान प्रदान केल्यास जिल्ह्याच्या विकासासाठी लाभदायक ठरू शकते.

श्री. यादव यांनी राज्यात सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या संदर्भात राज्यात होत असलेली अंमलबजावणी, त्यात येत असलेल्या अडीअडचणी याबाबत आढावा घेतला. अडचणींचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार सदैव तत्पर राहील याची हमी दिली. केंद्र शासनाच्या योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविणे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विभागाकडे असलेला डाटा सर्व विभागांनी एकत्र येऊन त्याचे पृथक्करण करावे आणि अधिकाधिक उद्दीष्टे निश्चित करुन त्यांच्या पुर्ततेसाठी एकत्रित कार्य करावे, असे निर्देश दिले.

केंद्र शासनाने रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत.  उद्योग उभारणीसाठी कर्ज, वीज, रस्ते, विमा याबाबी उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरूनही रोजगार निर्मितीक्षम उद्योग उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध विभागाच्या लाभार्थ्याना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

०००