ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करा – सचिव सुमंत भांगे

मुंबई, दि. 23 : ज्येष्ठ नागरिक दिन राज्यात 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त क्षेत्रीय अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने तालुका व जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन समन्वयाने आणि काटेकोरपणे करावे, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत सचिव सुमंत भांगे बोलत होते. या बैठकीला समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जनसेवा फाऊंडेशन पुणेचे डॉ.विनोद शहा, हेल्पेज इंडिया मुंबईचे प्रकाश बोरगांवकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अण्णासाहेब टेकाळे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सलमा खान यावेळी उपस्थित होते.

सचिव श्री.भांगे म्हणाले, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सहायक आयुक्तांनी कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करावी. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच शालेय विद्यालयांमध्ये देखील या कार्यक्रमांची माहिती व्हावी यासाठी सर्वांना सोबत घेवून कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा. शाळा महाविद्यालयांना कार्यक्रमात सहभागी करून शालेय स्तरावरही याबाबतीत जनजागृती करा, अशा सूचना श्री.भांगे यांनी केल्या.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागाकडून आयोजित असणाऱ्या कार्यक्रमांनाही ज्येष्ठ नागरिक संघटना सर्वतोपरी मदत करतील अशी ग्वाही यावेळी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी  दिली.

०००