इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : इरई नदी ही चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. पूर परिस्थितीमध्ये इरईचे पाणी शहरात येत असल्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. शहरात असेही काही भाग आहेत, जेथे ब्ल्यू लाईन आहे, मात्र वर्षानुवर्षे तेथे पाण्याचा एकही थेंब अजून पोहचला नाही. त्यामुळे याबाबत नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ब्ल्यू लाईन मुळे शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  दिली.

नियोजन सभागृहात चंद्रपूर शहरातील पूर नियंत्रण रेषा संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. पाटील, कार्यकारी अभियंता श्री. काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.

इरई नदीच्या रेड आणि ब्ल्यू लाईनबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटी यांनी सर्व्हे केला होता, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनंगटीवार म्हणाले, सध्या चंद्रपूर शहरात रेड लाईन ही 181.10 मीटर तर ब्ल्यू लाईन ही 179.6 मीटरवर आहे. ज्या जमिनीवर कधीच पाणी आले नाही, अशा ही काही जमिनी ब्ल्यू लाईनमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र ब्ल्यू लाईनमुळे बाधित होते. हे क्षेत्र मोठे आहे. विनाकारण नागरिक यात भरडले जाऊ नये. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा सामूहिक सर्व्हे करून व्यवस्थित टिपणी तयार करावी. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल. आयआयटीने केलेल्या सर्व्हेची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर शहरात 3 सप्टेंबर 1891 रोजी आलेल्या पुराची पठाणपुरा गेटवर 183.06 मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै 1913 मध्ये 180.06 मीटर, ऑगस्ट 1958 मध्ये 181.33 मीटर, सप्टेंबर 1959 मध्ये 180.89 मीटर, ऑक्टोबर 1986 मध्ये 180.76 मीटर मार्किंग असल्याची माहिती अधिक्षक अभियंता श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.

०००

 डिसेंबर अखेरपर्यंत उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना

आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करा

– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत 213 आजारांवर उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 98 हजार 142 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन ई कार्ड) वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरीत सर्व 6 लक्ष 42 हजार 751 नागरिकांना येत्या तीन महिन्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत या कार्डचे वितरण करा, अशा सुचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रलंबित कार्ड वाटपबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील भगत, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे ई – गोल्डन कार्ड वाटपाबाबत मिशन मोडवर काम करून येत्या तीन महिन्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप झाले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशात या कार्ड वाटपात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील, याबाबत आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य हा जनतेचा पहिला प्राधान्याचा विषय आहे. राज्यात आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना संयुक्तपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. यात आयुष्यमान भारत अंतर्गत 213 आजारांवर तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 अशा एकूण 1209 आजारांवर उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत एकूण 11 रुग्णालये असून यापैकी सहा रुग्णालये खाजगी आहेत. यात वासाडे रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, गोडेगोणे रुग्णालय, मानवतकर रुग्णालय, मुसळे रुग्णालय आणि ख्रिस्ट रुग्णालयाचा समावेश आहे. या सर्व खाजगी रुग्णालयांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. यात रुग्णालयाच्या अडीअडचणी आदींबाबत चर्चा केली जाईल.

जिल्ह्यात हायड्रोसिलचे जवळपास तीन हजारांच्या वर तर हत्तीपायाच्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या वर आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचे विशेष आरोग्य शिबिर राबवून जिल्ह्यातील सर्व हायड्रोसिलच्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रुग्णाने कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृतीपर माहिती रुग्णांपर्यंत पोहचवावी. तर जिल्ह्यात असलेल्या हत्तीपायाच्या रुग्णांचा समावेश दिव्यांगामध्ये कसा करता येईल, याबाबत मंत्रीमंडळात चर्चा केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 2 लक्ष 15 हजार 920 कुटुंब नोंदणी झाली असून लाभार्थी संख्या 8 लक्ष 30 हजार 893 आहे. यापैकी 1 लक्ष 98 हजार 142 लोकांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत 691 केंद्र आहे. यापैकी 385 केंद्राजवळ बायोमेट्रीक मशीन उपलब्ध आहे. तर शहरी भागात सर्व 402 आपले सरकार सेवा केंद्रात बायोमेट्रीक मशीन असून जिल्ह्यात एकूण 787 मशीन उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृती राठोड यांनी सांगितले.

००००