अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर, दि. 18 : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॅा.अनुपकुमार यादव उपस्थित होते.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समूहांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थींना व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तिकेत विविध योजनांची माहिती, लाभार्थींची पात्रता आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या उपसचिव आशाराणी पाटील, अवर सचिव शशांक बर्वे उपस्थित होते.