नागपूर, दि. २० :- मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लवकरच या संदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील अद्ययावत सोयी सुविधांविषयी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, “मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रुग्णांना औषधे वेळेत मिळतील याची दक्षता घेण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. पाच हजार स्वच्छता दूत, याप्रमाणेच साडेपाच हजार आशा कार्यकर्ती नव्याने नियुक्त करण्यात येतील. त्यामुळे आरोग्य सुविधा सुरळीत होण्यास मदत होईल”.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, पदभरती, आरोग्य तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल.
मुंबईतील गोवर आजाराची साथ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करीत आहे. आता गोवरची रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. गोवर रोखण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या लसीकरण अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करून पुढाकार घ्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अबू आझमी, अमीन पटेल, ॲड. पराग अळवणी, योगेश सागर आदींनी सहभाग घेतला.
00000
गोपाळ साळुंखे/स.सं