शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे

चंद्रपूर/नागपूर,दि. २०: विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर मोर्चा घेऊन आलेल्या लोककलाकारांच्या बहुतांश मागण्यांशी सहमती दर्शवत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला. शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

राज्यातील विशेषतः विदर्भातील लोककलाकारांच्या समस्यांसंदर्भात लक्ष वेधण्याकरता तसेच विविध मागण्या मांडण्याकरता लोककला सेवा मंडळाने विधिमंडळावर मोर्चा काढला होता. त्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विस्तृत चर्चा केली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात या चर्चेदरम्यानच त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.

लोककलाकारांच्या बहुतांश मागण्या रास्त असल्याचे मत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले. अशा रास्त मागण्या विनाविलंब मान्य करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी विभागाला केल्या. शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून लोककलाकारांनी निश्चिंत राहावे, असे सांगत त्यांनी भेटीसाठी आलेल्या लोककलाकारांना आश्वस्त केले. लोककला सेवा मंडळाचे पदाधिकारी अलंकार टेंभुर्णे, मनीष भिवगडे, राजकुमार घुले आदी कलाकार चर्चेत सहभागी होते.

000