महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
2

नागपूर, ता. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या  राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल लवकर जाहीर करावा. कोविड काळात परीक्षा घेता आल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्याना वाढीव कालावधी मिळाला आहे. यामध्ये किती विद्यार्थ्याना याचा लाभ घेता आला याची माहिती सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे आज दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे  अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, आ. वजाहत मिर्झा, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आदी या बैठकीला उपस्थित होते. लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे दूरदृश्य प्रणालीदवारे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या प्रश्नांसंदर्भात आवश्यकता पडल्यास उच्च स्तरावर बैठक घेण्यात येईल. पुणे शहरात या परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्याने आणि राज्याच्या ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचेही त्या म्हणाल्या.

—————–

राजू धोत्रे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here