क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सुविधा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

0
11

अमरावती, दि. २९ : महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान अमरावतीत आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधांसह वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. पांढरपट्टे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सह सचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उमेश खोडके यांच्यासह आरोग्‍य, प्रादेशिक परिवहन, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करुन विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात धनुर्विद्या या क्रीडा स्पर्धेचे करण्यात आले असून या स्‍पर्धेत सुमारे शंभर मुले-मुली स्पर्धक म्हणून, पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक मिळून एकूण २९७ खेळाडू सहभागी होत आहे. दि. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत सलग चार दिवस आर्चरी खेळात इंडीयन, कंपाऊंड व रिकर्व्ह प्रकारात क्रीडा संकुलात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना मेडल्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. होणार आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक श्री. संतान यांनी बैठकीत दिली.

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचे आयोजन

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्य स्पर्धा केंद्र पुणे असून या स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अमरावतीत देखील क्रीडा ज्योतीचे मार्गक्रमण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत उद्या दि. ३० डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून होणार आहे. इर्विन चौक- जयस्तंभ चौक- श्याम चौक- राजकमल चौक-राजापेठ चौक-नवाथे चौक-साईनगर चौक- बडनेरा आरडीआयके महाविद्यालय येथून अकोला अशाप्रकारे क्रीडा ज्योतीचे शहरातून मार्गक्रमण होईल. या रॅलीमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पीक संघटना, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, ज्येष्ठ खेडाळू, क्रीडाप्रेमी यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. या रॅलीत माध्यम प्रतिनिधींनी सुध्दा सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा विभागाद्वारे करण्यात आले आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here