मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान

नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, “हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मा. मोदीजींवर जे संस्कार केले त्यातून देशाला कणखर, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व मिळाले”.

“वयाच्या १०० व्या वर्षीही कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने करण्याची शिकवण त्या देतात यावरून त्यांचा कणखरपणा दिसून येतो. श्री. मोदीजी आणि हिराबा यांचे आत्मीय नाते होते. जेव्हा जेव्हा मोदीजी त्यांना भेटायला जायचे तेव्हा तेव्हा दृढ आणि तेवढ्याच प्रेमळ हिराबा आपणा सर्वांना पाहायला मिळायच्या. अशा मातांमुळे आपला देश महान आहे. आई सोबत नसणे हे जगातील सर्वात मोठे दुःख असते, श्री. मोदीजी, त्यांचे कुटुंब व स्नेही यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.