आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 30 : बेरोजगार तरुणांना नोकरीची प्रलोभने दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
प्लेसमेंट कार्यालयाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असल्याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.
नोकरीच्या आमिषाने फसवून देशाबाहेर नेलेल्या तरुणांना देशामध्ये परत आणण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. राज्यातील अशा प्रकारच्या तक्रारी त्या कक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००
धोंडिराम अर्जुन/ससं
भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची वरिष्ठ पातळीवर चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 30 : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाइपलाइनद्वारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उध्वस्त होत असल्याने या प्रकरणाची व्यवस्थापकीय संचालक किंवा संचालक यांच्यामार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
या संदर्भातील लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली होता, या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांचे युनिट क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीज निर्मिती होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ
विधवा महिलांविरुद्ध कुप्रथा बंद करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 30 : राज्यातील विधवा महिलांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.
राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा करण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रामराव पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यास श्री.फडणवीस यांनी उत्तर दिले.
विधवा महिलांच्या कुप्रथेच्या परिणामाबाबत 31 मे रोजी महिला विशेष ग्रामसभा घेतली जाईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाईल, असे श्री फडणवीस यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ