आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

0
7

औरंगाबाद, दि.३०, (विमाका) :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत श्री. केंद्रेकर बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले की, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून सर्व राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही प्रकारे आचारसंहीता भंग होण्याचा प्रकार घडणार नाही. आयोगाच्या आचारसंहिता पालन करण्याबाबत सर्व नियमांचा अभ्यास करून नियमांचे पालन करावे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक सुरक्षितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत सर्व खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपायुक्त श्री. मिनियार यांनी आदर्श आचारसंहिता तसेच नामनिर्देशनाबाबत माहिती दिली.  औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here