नवसंशोधकांना पूरक संशोधनातून संधी

नागपूर, दि. ५ :- देशाच्या प्रगतीसाठी पूरक संशोधन केल्यास नवसंशोधकांना देशहितासाठी काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील, असा निष्कर्ष पुनरूत्थानासाठी संशोधन परिषदेच्या बैठकीत काढण्यात आला. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेस अंतर्गत पुनरूत्थानासाठी संशोधन परिषदेचे आयोजन विद्यापीठ परिसरातील गुरूनानक भवन येथे आज करण्यात आले होते.

‘हेतुपूर्ण व परिणामकारक संशोधन कार्यप्रणाली तसेच भारत केंद्रीत संशोधन’, या विषयावर बोलतांना प्रा. राजेश बिनीवाले म्हणाले की, संशोधनात यशप्राप्तीसाठी उद्देश ठरवून काम करावे. लक्ष केंद्रित करून आवडीने शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे व आपल्या कामात सातत्य ठेवून हुशारीने त्यांची अंमलात आणावे. संशोधनात अपयश असे काही नसते, एका उद्देशात अपयशी ठरलेले संशोधन दुसऱ्या क्षेत्रात उपयोगी पडले असल्याची उदाहरणे त्यांनी दिले. संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘तपस’ या पाच दिवसीय अभ्यासक्रमाची माहिती दिली.

‘शाश्वत विकासासाठी भारतीय शिक्षण सुत्रप्रणाली’ या विषयावर वाराणसी येथील संपुर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे आचार्य ज्ञानेंद्र सापकोटा, भारतीय शिक्षण मंडळाचे महासचिव उमाशंकर पचौरी व आय. आय. एम. बोधगया येथील प्रा. विनीता सहाय यांनी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात ‘संशोधन आणि विकासासाठी उद्योग आणि धोरणाचा दृष्टीकोन’ या विषयावर मर्सिडिज बेंझ बंगळुरू येथील संशोधन अधिकारी अंशुमन अवस्थी, निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. राजीव कुमार, व व्ही.एन.आय.टी.चे संचालक प्रा. प्रमोद पडोले यांनी मार्गदर्शन केले. तर शेवटच्या सत्रात ‘संशोधन आणि विकासाच्या अंमलबजावणीसाठी कृती’, या विषयावर भारतीय शिक्षा मंडळाचे आयोजन सचिव आचार्य मुकुल कानिटकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रिसर्च फॉर रिसर्जन फाऊंडेशनचे (आर.एफ.आर.एफ.) महासंचालक प्रा. राजेश बिनीवाले, भारतीय शिक्षा मंडळाचे महासचिव उमाशंकर पचौरी, आय.आय.टी. खरगपूरचे प्रा. डॉ. मकरंद घांगरेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी परिषदेच्या उद्घाटनाची घोषणा केली. परिषदेस विविध राज्यातील संशोधक तसेच आर. एफ. आर. एफ. चे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

000