परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ६ : परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण मंडळांचे प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त देशांतर्गत मराठी भाषिकांचे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी राज्य शासनामार्फत यापुढे १० लाख रूपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मराठी भाषा तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे आयोजित पहिल्या मराठी विश्व संमेलनाचा आज समारोप झाला, त्या वेळी उपस्थित प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. दि. ४ जानेवारी पासून सुरू झालेल्या विश्व मराठी संमेलनात जगभरातील मराठी प्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी मंचावर शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर पुढे म्हणाले, मराठी भाषा शिकू इच्छिणाऱ्या परदेशस्थ विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने ‘प्रथम’ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. केंद्रीय मंडळांच्या शाळांसह जगभरातील केंब्रीज, ऑक्सफर्ड, हॉवर्ड यासारख्या शिक्षण मंडळांसोबत चर्चा सुरू असून या मंडळांच्या विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.

हे संमेलनाचे पहिले वर्ष असतांनाही मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करून श्री. केसरकर पुढे म्हणाले, पुढील वर्षी नियोजन करतांना मराठी संवर्धनासाठी योगदान देणारे साहित्यिक आणि  महाराष्ट्रामध्ये मराठीचे संवर्धन करू इच्छिणाऱ्या लोकांच्या संस्था रजिस्टर करून एकत्रित केले जाईल. त्यांच्यासाठी वर्षभर संपर्कात राहण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला जाईल.

जगभरातील महाराष्ट्रीय उद्योजकांची औद्योगिक परिषद झाली. श्री. केसरकर या परिषदेत उपस्थित झालेल्या ७० उद्योजकांचे विशेष आभार मानले. यांच्या माध्यमातून राज्याला तांत्रिक बाबींच्या माहितीची भर पडली, कृत्रिम बुद्धीमत्ता याचा वापर करून शेतीपासून निर्यात उद्योगांपर्यंत यांचे योगदान कसे घेता येईल यांवर चर्चा झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तर सांस्कृतिक कार्य, उद्योग, नगरविकास विभागाचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मराठी भाषिक एकत्र येऊन भाषा संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्याच्या उद्देशाने अशा संमेलनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. असे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांना राज्यशासनामार्फत विविध साहित्य, ग्रंथसंपदा प्रदान करण्यात येईल. तसेच यापुढे दरवर्षी होणाऱ्या विश्व मराठी संमेलनांची निमंत्रणे संबंधितांना संमेलनापूर्वी किमान ६ महिने अगोदर पाठविण्याच्या सूचना करुन विश्व मराठी संमेलनासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येईल.

देशातील नोंदणीकृत मराठी मंडळातील सदस्यांच्या पाल्यांना महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडावे या उद्देशाने त्यांच्यासाठी महाराष्ट्रात शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

००००