राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

मुंबई, दि.9: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर बैठकीत आयोगाकडे आलेल्या विविध विषयांवरील तक्रारींची सुनावणी होणार आहे. उद्घाटन सत्रात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मार्गदर्शन करणार आहेत.

मानवाधिकारांचे अधिक चांगले संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने अशा शिबीर बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 11 आणि 12 रोजी तक्रारींची सुनावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

0000

दिपक चव्हाण/ वि.स.अ/९.१.२०२३